Saturday, September 1, 2012

नैना ठग लेंगे...

'तो' दिवस, उभ्या आयुष्यात मी कध्धीच विसरू शकणार नाही.. तुझी शप्पथ.....

तीन दिवसात गोव्याला धावती भेट देऊन आमचा कंपू परतला होता. गोव्यात केलेली मज्जा बाकी सगळ्यांना ऐकवायची आणि फोटो दाखवून जळवायचे ह्या आनंदी विचारातच मी कॉलेजला आलो होतो, पण हाय रे दुर्दैव.. आल्या आल्या कानावर बातमी पडली `मराठे'ने पोइंटर्स संपवले. पायाखालची वाळूच सरकली. जे संगणकातील जाणकार आहेत त्यांना पोइंटर्स किती महत्वाचे असतात आणि समजायला किती कठीण ह्याची कल्पना असेलच आणि नेमके आमचा ग्रुप दांडी मारून गोव्यात कल्ला करत असतानाच मराठेला पोइंटर्स घ्यायला वेळ मिळाला...:-(

नशीब बलवत्तर होते म्हणून वाचलो. सरांकडून कळले कि दुसऱ्या डिविजन मध्ये आजून होयचे आहे. एक मोठ्ठा हुश्श करून सुटकेचा निश्वास टाकला खरा .. पण तो तेवढ्यापुरताच होता, कारण पुढे काय होणार होते हे थोडे न मला माहित होते!


दुसऱ्या दिवशी आमच्या कंपूबरोबर मराठेच्या लेक्चरला दुसऱ्या वर्गात आलो. खर तर आम्ही सगळे आमच्याच धुंदीत असणारे. आमचे कॉलेज चे जग आमच्या पुरतेच मर्यादित होते त्यामुळे बाकी इतर कुणाशी आमच्या ओळखी असण्याचा फारसा संबंध नव्हता.

अर्थात म्हणून काय शांत बसायचे का? शिवाय लेक्चरच्या सुरुवातीचा बराचसा भाग आमच्या वर्गात आधीच कव्हर झाला होता त्यामुळे पॉईंटर्स सुरु होईपर्यंत लक्ष नाही दिले तरीही चालण्यासारखे होते. शिवाय मराठे सरांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आमच्या टवाळक्यांकडे सर नकळतच दुर्लक्ष करत होते.

पहीला सेक्शन संपत आला आणि सरांनी नेहमीच्या गाठोड्यातील प्रश्न विचारायला सुरुवात केली. आमच्या कंपुमध्ये त्यातल्या त्यात मी हुशार असल्याने अर्थात उत्तर द्यायची जबाबदारी सर्वस्वी माझी होती आणि त्यास मी पुरेपुर जागत होतो. वर्गातील बाकीचे अर्थातच अचंबीत होऊन माझ्याकडे बघत होते आणि सरांनी अचानकच एक गुगली प्रश्न टाकला. मी फारसा विचार न करता उत्तर देऊन टाकले आणि सरांच्या चेहर्‍यावर एक छद्मी हास्य पसरले.

"गोव्याची फेणी उतरली नाही का अजुन?", अनपेक्षीतपणे सरांनी प्रश्न केला आणि वर्गात एकच हशा पसरला.

मी खजील चेहर्‍याने वर्गातुन माझी नजर फिरवत होतो आणि अचानक माझी नजर दुसर्‍या बेंच वर बसलेल्या तुझ्यावर पडली.  बस्स.. हाच तो क्षण जेथुन माझ्या आयुष्यात तु आलीस. काही गरज होती का तुला मागे वळुन बघायची? काही गरज होती का तुला आपल्या केसांना सांभाळत कानावरुन मागे सरकवायची? काय गरज होती तुला ते मधाळ हास्य करण्याची? कोणी हक्क दिला तुला माझं काळीज असं नकळत स्वतःचं करुन घेण्याची?

का? का? का?

तुझी आणि माझी काही क्षणांसाठी झालेली नजरानजर काळजाला भगदाडं पाडुन गेली. पुढचा पुर्ण तास माझं लक्षच नव्हते. नजर फिरुन फिरुन तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडेच जात होती.

कोण होतीस तु? इतके दिवस मी तुला कधीच कसं नाही पाहीलं? असं नाही की कॉलेजमध्ये सुंदर मुली नव्हत्या. पण तुझ्याकडे बघीतल्यावर जसं वाटलं तसं कुणाच्याच बाबतीत का नाही कधी वाटलं? का मला असं वाटलं की मी तुला खुप आधीपासुन ओळखतोय? का तुझ्याशी पुन्हा पुन्हा नजरानजर व्हावी अशी हुरहुर लागुन राहीली? मराठे सरांच लेक्चर असुनही का आज माझं दुर्लक्ष होते आहे?
*****************

मी ह्याला प्रेम वगैरे नक्कीच म्हणणार नाही. बेसीकली ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ वगैरे तत्वांवर माझा विश्वास नाही. परंतु ह्या अनामीक ओढेचं काय? असं ऑल ऑफ अ सडन तुझ्याबद्दल माझं मन का विचार करु लागलं? काहीही ओळख पाळख नसताना, तुला आधी कधीही पाहीलेले नसताना?

वर्गातुन बाहेर पडलो तेंव्हा नकळत मनामध्ये एक गाणं तरळत होतं...

"जांगते जादु फ़ुकेंगे रे.. जागते जागते जादु..
जांगते जादु फ़ुकेंगे रे..निंदे बंजर कर देंगे..
नैना ठग लेंगे....
नैना ठग लेंगे ठग लेंगे... नैना ठग लेंगे........"


0 comments:

Post a Comment

 
;