Thursday, August 30, 2012

वेड्या मना...

वेड्या मना.. .काय लिहू ह्या ब्लॉग बद्दल? हा ब्लॉग सुरु करणे हाच खरं तर माझ्या मनाचा एक वेडेपणा आहे. पण मी हतबल आहे.. तसं पाहीलं तर फक्त एकच आठवडा झाला तुला बघून. पण ‘त्या’ दिवसापासुन मी माझा राहीलोच नाही. कस्तुरीच्या वासानं ‘कस्तुरी मृग’ कसं सैरभैर होऊन धावत सुटतं, अगद्दी तस्सच झालंय माझं. तुला पाहील्यापासुन वेडा झालोय, बेभान झालोय. माझा माझ्या मनावर, माझ्या नजरेवर ताबाच राहीलेला नाही. सतत ते तुझ्याच कडे धावतं आहे.

तसा मी अंतर्मुख, फारसा न बोलणारा, स्वतःच्याच विश्वात रमणारा. पण तुला पाहील्यापासुन माझ्या मनाला अचानक अंकुर फुटले. मनामध्ये विचारांची, शब्दांची गर्दी होऊ लागली. इतकी गर्दी की हे शब्द बाहेर नाही पडले तर उर फुटुन बाहेर पडतील की काय असे वाटु लागले आहे. आणि म्हणुनच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आज ह्या ब्लॉगचा आधार घेऊ पहात आहे. मला माहीत आहे ह्या कुबड्या मला कुठपर्यंत तारतील हा प्रश्न आहे.. पण तरीही.. तरीही लंगडत लंगडत का होईना माझ्या भावना इथे मांडणार आहे.

प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त तुझाच विचार. आज हा ब्लॉग बनवायला बसलो आणि डिझाईनसाठी इतकी शोधाशोध केली. पण कुठलेही टेम्प्लेट तुझ्या सौदर्यापुढे फिक्केच वाटले. मग विचार केला, ब्लॉगला रंग-संगती हवीच कश्याला. तुझ्या प्रेमाचे रंगच शब्दामधुन इतके छान उतरणार आहेत की ब्लॉगचे रंग हवेतच कश्याला.. हो ना?

वाचकवर्गाला ह्या तरल भावना, त्यातील उत्कंठा, त्यात तुझ्याविषयी तुडुंब भरलेले प्रेम आणि इतरही बरेच काही वाचायला आवडेल अशी आशा करतो...

चला तर मग सुरुवात करूयात अजून एका प्रेम-दुनियेची..



तुझाच..
तरुण

खर तर तुझाच म्हणायचं की नाही? खूप विचार केला यावर.. मी लाख म्हणेन मी तुझा आहे पण तू करशील का हे मान्य? मला वाटते ह्याचे उत्तर माझ्याकडे नाहीये.. सो ते येणारा काळच ठरवेल. फक्त माझ्याबद्दल विचार केला तर मी नक्कीच तुझाच आहे.. त्या दिवशीच तुझाच झालोय...


0 comments:

Post a Comment

 
;